आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे - २० टिप्स How To Achieve Success in Life

   


आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे - २० टिप्स


------------------------------------
यश नशिबाने मिळत नाही व वैभव कधीच अपघाताने मिळत नाही. जे वैभवसंपन्न व यशस्वी झाले त्यांनी स्वतःला अधिक उत्पादनक्षम व प्रभावी बनवण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या. जर तुम्हाला आयुष्यात सुपर सक्सेस मिळवायचे असेल तर श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सवयींवर लक्ष केंद्रित करून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपल्या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. मी तुम्हाला २० टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीमंत व यशस्वी व्हाल.

१) गोल सेट करा व बाकी कचरा फेका : ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी वचनबध्द व्हा, ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटू नका. ज्यातून काही लाभ होत नाही अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करा.

२) दैनंदिन सवयी विकसित करा : पैसा व यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम सवयी लावणे ही मूलभूत गरज आहे. यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये त्यांच्या दैनंदिन सवयी हाच फरक असतो. यश कोणाला सहज मिळत नसते, त्यासाठी खूप कष्ट, मेहनत, समर्पण व समृध्दीसाठी आवश्यक असणार्‍या सवयी लावणे महत्वाचे असते. उदा. सकाळी लवकर उठणे, डेली प्लॅन तयार करणे, सकस आहार, व्यायाम, ध्येय निश्चिती, टू डू लिस्ट बनवणे, वेळेस महत्व देणे, सर्व कामे वेळेवर पार पाडणे, वाचन करणे, हेतूपूर्वक जोखीम घेणे, नेटवर्किंग, संयम या सर्व सवयी यशस्वी व्यक्ती स्वतःला लावून घेतात.

३) यश व्हीज्युअलाईझ करा : यशस्वी व्यक्ती स्वतःचे ध्येय सतत डोळ्यासमोर जिवंत ठेवून काम करतात. जेव्हा आपण आपले ध्येय व्हीज्युअलाईझ करतो, तेव्हा नवीन कौशल्ये आत्मसात करणे व चांगल्या सवयी स्वत:ला लावणे या गोष्टी सहजपणे होतात. आपले ध्येय दृष्यमान करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, ते व्हीज्युअलाईझ करा व पुढे चला. यशाचा मार्ग सापडत जाईल सर्व यशस्वी व्यक्ती यशाच्या व्हीज्युअलायझेशनचे महत्व जाणतात. प्रत्यक्ष काम करण्याअगोदर त्यांच्या यशाकडे जाण्याचा रोडमॅप हा त्यांच्या दृष्यमानतेच्या रूपात तयारच असतो. ती योग्यरित्या वापरली तर अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या मनात तुम्ही तुमच्या ध्येयाचे व यशाचे चित्रच तयार केले नसेल तर तुमची अवस्था आंधळ्या माणसासारखी होईल. तुम्हाला यशाची संधी कधीच मिळणार नाही.

४) नेटवर्क विकसित करा : समविचारी लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे एक नेटवर्क विकसित करा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या सभोवती यशस्वी लोकांचे नेटवर्क असणे आवश्यक आहे. यशस्वी व्यक्ती आपला बराच वेळ कॉन्फरन्स, मिटींग्ज, बिझनेस क्लब, इव्हेंटस, सेमिनार्स याद्वारे आपले नेटवर्क विकसित करतात. तर काही वेळा फक्त एक कॉफी पुरेशी असते. अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ.

५) लवकर सुरुवात करा : उपयोगी व कौशल्याभिमुख शिक्षण घ्या, कमी वेळेत पूर्ण होणारे व कमी शिक्षण घ्या. आपल्या उमेदीचा बराच काळ शिक्षणात व स्पर्धा परीक्षा देण्यात जातो व वय निघून गेल्यावर नोकरी शोधत बसतात. वाया गेलेल्या वेळेचे महत्व वेळ निघून गेल्यावर कळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या व कामाला लागा नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल.

६) जागा ठिकाण बदला : चौकटीबाहेर पडा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तेथील परिस्थितीचे निरीक्षण करा व संधी ओळखा. जगात शिकण्यासारखे बरेच काही असते. प्रवासामुळे अनेक संकल्पना, संधी सुचतात. त्याचा आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.

७) माईंड रीड करा : कोणत्याही ध्येयाच्या मागे जाताना यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन अत्यंत खंबीर व संतुलित असावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मनाचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे. आपले मन क्लिअर असेल तरच आपली निर्णयक्षमता प्रभावी ठरते. आपल्या ध्येयावर विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे मनातून विश्लेषण झाले पाहिजे त्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक असते.

८) स्वतःशी प्रामाणिक रहा : जर तुम्हाला स्वत:ची ओळख बनवायची असेल, स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. त्यामुळे योग्य निर्णयक्षमता वाढीस लागेल. जे लोक स्वतःशी प्रामाणिक नसतात, त्यांचे करिअर, वैयक्तिक जीवन, प्रतिष्ठा यामध्ये संतुलन नसते. त्यामुळे यश प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात.

९) डिसीप्लीन मेंटेन करा : शिस्त हा आपले ध्येय व ध्येयपूर्ती म्हणजेच यश यामधला पूल आहे. आपले आचार, विचार, वर्तन, संभाषण, संबध, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन या सर्वात शिस्त हवीच. जे लोक यशाच्या उच्च शिखरावर पोहचले आहेत त्यांनी आयुष्यात शिस्तीला अति महत्व दिले आहे. शिस्तबद्धता हा यशस्वी व श्रीमंत व्यक्तींमधला सर्वोत्तम गुण आहे, शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते व ध्येय गाठण्यास मदत होते.

१०) कम्फर्ट झोनच्या बाहेर या : नवनवीन आव्हान स्वीकारा. डबक्यातले बेडूक डबक्यातच राहते. तुम्ही बेडूक बनू नका. मी आहे त्यात सुखी आहे, उगाचच रिस्क का घेऊ? ही वृत्ती सोडा. नाहीतर एक दिवस पश्चातापाची पाळी येईल. जीवनात बदल घडवण्यासाठी आपल्या मनाने गुरफटलेल्या कोशातून बाहेर पडल्यावरच नवनवीन संधी दिसतील.

११) आपला दर्जा उच्च ठेवा : Hold high standards always, नाहीतर जगात तुमची किंमत काहीच राहणार नाही. श्रीमंत लोकांच्या जीवन शैलीकडे पहा. त्यांची प्रत्येक गोष्ट, त्यांचे वर्तन, संभाषण, फ्रेंड सर्कल हे उच्च दर्जाचे असतात. त्यामुळे त्यांना अधिक प्रतिष्ठा मिळालेली असते. ते स्वतःच एक ब्रॅंड असतात आणि ब्रॅंड है तो सबकुछ है। त्यामुळे आपला दर्जा उच्च असलाच पाहिजे.

१२) सकाळी लवकर उठा : प्रत्येक यशस्वी व श्रीमंत व्यक्ती ही सकाळी लवकर उठत असते. सकाळी लवकर उठून आपल्या दिनचर्येचे नियोजन करावे. सकाळी लवकर उठणे हे यश मिळवण्याचा प्रभावशाली मार्ग आहे. थॉमस कार्लीच्या मते ४४ टक्के श्रीमंत व्यक्ती कामाच्या वेळेच्या ३ तास लवकर उठतात.

१३) आरोग्य चांगले ठेवा : प्रत्येक श्रीमंत व यशस्वी व्यक्तीकडे पाहिल्यास प्रथम दर्शनी त्यांचे व्यक्तीमत्व व आरोग्य सुदृढ असल्याचे दिसून येते. यशस्वी व्यक्ती त्यांच्या आहाराच्या सवयीबाबत काटेकोर असतात. बहुतांश यशस्वी लोक शाकाहारी असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्यमान दीर्घ, निरोगी व व्याधीरहित असते. आहारासोबतच फिट राहण्यासाठी व्यायाम किंवा योगा करणे महत्वाचे आहे. त्यासाठी आवर्जून वेळ काढत आरोग्यावर लक्ष हवे तरच आयुष्यात लक्ष गाठता येईल.

१४) बी इनोव्हेटीव : सतत नवनवीन कल्पना शोधण्यासाठी प्रयत्नशील रहा. जे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्यासाठी मेहनत घेतात तेच यशस्वी होतात. आणि स्वत:ची वेगळी ओळख बनवतात. उदा. मार्क झुकेनबर्ग, स्टीव्ह जॉब्स, संदीप माहेश्वरी, धिरूभाई अंबानी इत्यादी या प्रत्येकाने काहीतरी नावीन्यपूर्ण गोष्ट केली व त्यात यशस्वी झाले आज त्यांचे नाव ब्रॅंडनेम बनले आहे.

१५) Find Your Passion : आपली तीव्र आवड (पॅशन) शोधा. ज्या गोष्टीत आपल्याला परम आनंद भेटतो अशी गोष्ट करा. अशा कल्पनांवर काम करा, ज्यात  तुमचे लक्ष अधिक प्रभावपणे केंद्रीत होईल, उत्साह वाढेल व निश्चय दृढ होईल.

१६) 'का' चे उत्तर शोधा : कोणत्याही ध्येयाची सुरुवात करण्याआधी ती का करावी, याचे उत्तर आपल्याकडे असणे आवश्यक आहे, कारण हेच उत्तर आपल्या यशाचा मार्ग व दिशा ठरवत असते. आयुष्यभर प्रश्नचिन्ह डोक्यावर घेऊन यशस्वी होता येत नसते. कधी कधी या 'का' चे उत्तर सहजपणे मिळत नाही. हा Why (का) म्हणजेच आपली प्रेरणा किंवा आपले उच्च धेय असू शकते. तुम्ही 'काय' करता याला महत्व नाही, तर तुम्ही एखादी गोष्ट 'का' करता हे समजणे फार महत्वाचे आहे.

17) Act & Work fearlessly : प्रत्यक्ष कृती करा व निडरपणे कामाला लागा. यशस्वी व्यक्ती जोखीम घेण्यास घाबरत नाहीत, परिणामी ते सतत नवनवीन आव्हानांना स्वीकारत असतात. त्यानुसार ते योग्य नियोजनही करत असतात. इतिहास साक्षी आहे. आपल्या कल्पनांना कृतीत आणण्यासाठी जोखीम घेऊन जे लोक कामाला लागले, तेच यशस्वी झाले. छत्रपती शिवरायांजवळ काहीच नव्हते तरी त्यांनी स्वराज्य निर्माण केलेच ना?

१८) जे लोक तुमच्या सोबत येतील त्यांना घ्या, बाकीच्यांना सोडून द्या. यशस्वी होण्यासाठी आपल्या भोवती यशस्वी व चांगल्या लोकांचे नेटवर्क असावे. यशस्वी लोकांव्यतिरिक्त ज्यांना यशाची भूक आहे व जे यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत अशाचे नेटवर्क विकसित करणे आवश्यक आहे, कारण हेच लोक तुमच्या ध्येयपूर्तीच्या मार्गावर तुमची साथ देतील व कायम तुमचा आत्मविश्वास वाढवत राहतील. ज्यांच्या तुमच्यावर व तुमच्या ध्येयावर विश्वास आहे, अशानांच सोबत घ्या व बाकीच्यांना सोडून द्या. जे लोक तुमच्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असे लोक ओळखायला शिका.

१९) वाचन करा : वाचन हा यशस्वी लोकांमध्ये दिसणारा ठळक गुण आहे. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनते. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबली नाही पाहिजे, त्याचा उपयोग कायम प्रत्यक्ष जीवनात होतो. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, इतरांचे ऐकण्याची सवयी लागते. त्यामुळे कामाची गती वाढते, वाचनाची आवड असेल, तर एखाद्या विषयावरील चर्चेत आपण ठळकपणे मुद्दे मांडू शकतो.

२०) अर्थिक साक्षरता : पैसा, गुंतवणूक, अर्थसहाय्य, कर्ज, सबसिडी, कर, शेअर्स, खेळते भांडवल, अकाउंटिंग, फायनान्स इत्यादी सर्वांबद्दल चांगली माहिती यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
व्हॉटसअ‍ॅप क्रमांक - ९८६७८०६३९९